भीमा कोरेगाव विजयस्तंभावरील अतिक्रमण अखेर निष्काशित
कोर्टात अतिक्रमणधारक उघड, जमिनीची मालकी शासनाचीच
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नांना यश
नागपूर : पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभावरील पन्नास वर्षांपासूनचे असलेले अतिक्रमण अखेर पुणे जिल्हा दिवणी न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले. विजयस्तंभाची रखवाली करणारा त्यावरील जागेचा मालक कसा होऊ शकतो, असा सवाल करत माळवदकर जमादार कुटूंबाच्या नावावर विजयस्तंभाची जमिन कधीच नव्हती. सदर जमिनीचा मालक शासनच होता व राहील असे बजावत गुलाब बाबुराव माळवदकर जमादार यांचा या जागेवरील हक्क न्यायालयाने आज फेटाळून लावला, त्यामुळे राज्यतीलच नव्हे तर देशभरातील आंबेडकरी जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे सांगितले. पुण्यातील जिल्हा दिवाणी न्यायालयाने यासंबंधी निकाल जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर बडोले पत्रकारांसोबत बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतील शूर विरांचा अभिमान होता. बाबासाहेब हयातभर या विजयस्ंतभाला दरवर्षी एक जानेवारीला भेट द्यायचे. मात्र त्यांच्या नंतर या जमिनीवर माळवदकर जमादार कुटूंबियांना अतिक्रमण सातबारा स्वतःच्या नावे केला होता. आज या स्मारकावरील अतिक्रमण दूर झाल्यामुळे मला अत्यानंद झाला असून स्मारकाच्या विकासाचा मोठा उपक्रम राबवण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून या खटल्यातील वकिल अजय गाडेगावकर आणि स्थानिक कार्यकर्ते दादाभाऊ अभंग यांची मोलाची मदत झाली अशा शब्दात राजकुमार बडोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी गणूजी माळवदकर जमादार याला १८१८ मध्ये ब्रिटीशांनी दिली होती. ब्रिटीशांच्या सनदीप्रमाणे त्याच्या कुटुंबाने शासनाच्या मर्जीनुसार स्तंभाची देखभाल केल्यास २६० एकर जमिन त्यांना उदरनिर्वाहासाठी देण्याची शक्यता होती. मात्र गणूजी माळवदकर जमादार याचा १८२४ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटूंबियांपैकी कोणीही विजयस्तंभाची देखभाल केली नाही, म्हणजे शासनाची मर्जी राखली नाही, त्यामुळे सदर जमिन कधीही माळवदकर कुटूंबियातील कोणाच्याही नावावर नव्हती असेही बडोले यांनी स्पष्ट केले.
मावळदकर यांचे सध्याचे वंशज गुलाबराव बाबुराव मावळदकर, नामदेव व अशोक गुलाबराव मावळद्कर तसेच सरस्वती गुलाबराव मावळदकर यांनी भिमाकोरेगाव विजयस्तंभ व लगतची १३ एकर जागा १९६५-६६ च्या दरम्यान स्वतःच्या नावावर करून या ऐतिहासिक स्तंभावर स्वतःची खाजगी मालकी दाखवली होती. सदर मालकी पुण्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने अनधिकृत ठरवीत त्यांची मालकी संपुष्टात आणली होती. त्याविरोधात माळवदकर कुटूंबियांनी पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हिल्ला हरकतीसाठी केलेला अर्ज खारीज करून, विजय स्तंभावरील जमिनीचा मालक राज्य शासन असल्याचे शिक्कामोर्तब केले, असे बडोले यांनी यावेळी सांगितले.