उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एकमत नाही
नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या एका तक्रारीवरुन महाबळेश्वरमधील रिसॉर्ट ध्वनीप्रदूषणामुळे सील केले जाते आणि दुसरीकडे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाईट लाईफ विकसित केली पाहिजे म्हणून आग्रही आहेत. या घटनेवरून उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एकमत नसल्याचे दिसून येते त्यामुळे उध्दव ठाकरे यांची की आदित्य ठाकरे यांची भूमिका खरी याचा खुलासा शिवसेनेने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
महाबळेश्वरमध्ये ध्वनीप्रदूषणाच्या त्रासामुळे रिसॉर्ट सील करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे हे नाईट लाईफसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी ध्वनीप्रदूषणामुळे तक्रार केल्यानंतर रिसॉर्ट सील केले जाते. याचाच अर्थ दोघांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे दोघांच्या भूमिकांमध्ये महत्वाची भूमिका कुणाची आहे याचा खुलासा व्हावा असे मलिक म्हणाले.शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे. मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण विभाग आहे. कुठे तरी नेता तक्रार करतो तेव्हा कारवाई होते. परंतु सर्व सामान्यांनी तक्रारी केल्यानंतर मात्र त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई होत नाही. सर्वसामान्यांच्या तक्रारी दुर्लक्षित करा. आम्हाला त्रास होता कामा नये अशी भूमिका राज्य सरकारची असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.