मंत्र्यांच्या दौ-यांची माहिती मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कळवावी लागणार
मुंबई : मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे इतर राज्यातील दौ-याची माहिती राजशिष्टाचार विभागामार्फत फॅक्सद्वारे संबंधित राज्याला पाठविण्याची पध्दत नव्या वर्षापासून बंद करण्यात येणार असून, इतर राज्यातील दौ-याचा कार्यक्रम मंत्री कार्यालयाला संबंधित राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पाठवावा लागणार आहे. त्यासंदर्भात शासनाने आज परिपत्रक जारी केले आहे.
मंत्री, राज्यमंत्री दुस-या राज्याच्या दौ-यावर जातात तेव्हा संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयाकडून दौ-याचा तपशील राजशिष्टाचार कार्यालयाला पाठवला जातो.त्यानंतर सदर कार्यक्रम मुख्य सचिव कार्यालयाकडे पाठवला जातो.परंतु इतर राज्यातील मंत्र्यांचा दौरा असल्यास राजशिष्टाचार विभागाऐवजी मंत्री कार्यालयाकडून राजशिष्टाचार विभागाला कळविला जातो. मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या दौ-यामध्ये ऐनवेळी काही बदल झाल्यास किंवा दौरा रद्द झाल्यास संबंधित राज्याला कळविले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे दौरे रद्द झाल्यास त्या राज्यातील संबंधित यंत्रणा आपल्या राजशिष्टाचार विभागाशी संपर्क साधते मात्र याची कल्पना या विभागास नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून येत्या १ जानेवारीपासून आपल्या राज्यातील मंत्री , राज्यमंत्री इतर राज्यात दौरा करणार असतील तर सदर दौ-याची माहिती संबंधित राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना द्यावी लागणार असून, राजशिष्टाचार विभागामार्फत फॅक्सद्वारे संबंधित राज्याना माहिती पाठविण्याची पध्दत आता बंद करण्यात आली आहे.