हे तर वरातीमागून घोडे – धनंजय मुंडे
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात घोड्यावर बसून बोन्डअळी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, पंचनामे करण्याचा हा प्रकार म्हणजे मराठीतील वरातीमागून घोडे या म्हणी प्रमाणे आहे असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे..
मुळात शेतक-यांच्या कापसाचे बोन्ड अळी मुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शासनाच्या पंचनामे आणि मदतीच्या जाचक अटी पाहून मदतीची आशा सोडून देत कापसाचे पीक केव्हाच मोडून काढले आहे, अशा वेळी हा पंचनाम्याचा केवळ देखावा असून तो शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. उंटावरून शेळ्या हाकणे हा वाक्यप्रचार माहीत होता आता भाजपच्या राज्यात घोड्यावरून पंचनामे हा नवीन वाक्यप्रचार रूढ होईल असा टोला त्यांनी लगावला आहे.
कर्जमाफी सारखीच सरकारची शेतक-यांना जाहीर केलेली मदत हि फसवी आहे. सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले असून स्वतःच्या तिजोरीतून एक रुपयांची हि मदत दिली नाही. एन.डी.आर.एफ , पीक विमा आणि बियाणे कंपण्याच्या खिशात हात घातला आहे, मात्र पीक विमा कंपन्या आणि बियाणे उत्पादक कंपन्या शेतक-यांना कितपद मदत करतील या बाबत शंकाच आहे. त्यामुळे शेतक-यांची पुन्हा एकदा फसवणूक झाली असल्याचे सांगून घोड्यावरून पंचनामे करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सरकारला शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल तर बोन्ड अळी चे नैसर्गिक संकट जाहीर करून पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर केली पाहिजे असेही मुंडे म्हणाले. सरकारने अधिवेशनात शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असली तरी हा विषय आपण यापुढेही लावून धरू असेही मुंडे म्हणाले.