मोजोस बिस्ट्रोच्या अग्नितांडवात १४ जणांचा मृत्यू, १२ जखमी
मालका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबच्या अग्नितांडवात १४ जणांचा मृत्यू झाला असून, १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे अग्नितांडव एवढं भीषण होतं की, मोजोसच्या खाली असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत होरपळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ४ तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रात्री १२.३० च्या सुमारास मोजो पबमध्ये आग लागली.
आगीच्या घटनेमुळे कमला मिल कम्पाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीच्या लोळमुळे हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोजो हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते.
मृतांची नावे-
प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल, खुशबू, मनीषा शहा, प्राची शहा, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी, विश्व ललानी
हॉटेल चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. वन अबाव आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची समजते.दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.”कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचे मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत,” असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.