आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल

आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल

अमरावती : मालमत्तेची माहिती निवडणुक आयोगापासून लपवल्यामुळे अपक्ष आमदार बच्चु कडू यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे.
गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

अचलपूर मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू (बच्चू कडू) यांनी मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून आसेगाव पोलिसांनी आमदार कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली. तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित यंत्रणेकडून त्यासंदर्भातील माहिती प्राप्त केली असता, त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचा त्यांचा दावा आहे.

आमदार कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) या यंत्रणेकडून २०११ मध्ये ४२ लाख ४५ हजार रुपयांत हा फ्लॅट विकत घेतला. १९ एप्रिल २०११ रोजी त्या फ्लॅटचा ताबा आमदार कडू यांनी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी अचलपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर केला. निवडणुकीचा अर्ज सादर करताना उमेदवारांना स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या मालकीच्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे एका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा लागतो. परंतु, आमदार कडू यांनी मुंबई येथील मालमत्तेसंदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला.त्यामुळे आमदार कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ अ, ब, अन्वये अदखलपात्र गुन्हा आसेगावपूर्णा पोलिसांनी दाखल केला. तिरमारे यांनी माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीचे दस्तऐवज आसेगाव पोलिसांकडे सादर केले आहेत.

Previous articleशरद पवार हे भावी राष्ट्रपती !
Next articleअग्नितांडव : तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here