खबरदार..आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रूपये दंड
मुंबई : रस्त्यावर घाण केल्यास, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु खाऊन थुंकल्यास आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.यापुढे दंड वसुल करण्याचे अधिकार राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींना देण्यात आले असून, सदर आदेशाची तात्काळ अंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-यांना दंड ठोठावला जाणार आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार रस्त्यावर घाण केल्यास अ,ब वर्गातील नगरपरिषद संबंधितावर १८० रूपयांचा दंड आकारणार आहे तर क आणि ड वर्गातील नगरपरिषदा अशा व्यक्तींवर १५० रूपये दंड आकारणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अ आणि ब वर्ग नगरपरिषद संबंधितांवर १५० रूपयांचा तर क आणि ड वर्ग नगरपरिषद १०० रूपये दंड आकारणार आहे. उघड्यावर लघवी करणा-याला अ ,ब वर्ग नगरपरिषद २०० रूपये तर क,ड वर्गवारीतील नगरपरिषद १०० रूपये दंड आकारणार आहे. उघड्यावर शौच करणा-या व्यक्तीला या दोन्ही वर्गवारीतील नगरपरिषदा ५०० रूपयांचा दंड आकारणार आहेत.या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार असल्याने यापुढे अशी कृती करणा-यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.