महाराष्ट्र बंद : राज्यात सध्या काय परिस्थिती आहे ?

महाराष्ट्र बंद : राज्यात सध्या काय परिस्थिती आहे ?

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वच चित्र आहे. आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील परिस्थिती काय आहे जाणून घेवू या.

पुणे : पुण्यामध्ये एसटी बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी आहे. स्वारगेट बस स्थानकात मोजकेच प्रवासी दिसून येत होते. पुणे- सातारा, पुणे- बारामती बससेवा स्थगित करण्यात आली आहे. तर शहरातील अनेक शाळांनी शाळेत आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठवले आहे

औरंगाबाद : समाज माध्यमावरून अफवा पसरू नये म्हणून शहरातील इंटरनेट सेवा १२ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. रात्री १२ ते आज दुपारी १२ पर्यंत शहरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येईल. सोयगाव शहरात कडकडीत बंद. सर्व दुकाने, बस डेपो तसेच खाजगी वाहतूक बंद ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसटी, बस सेवा बंद आहेत.

मुंबई : आजच्या महाराष्ट्र बंदला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा दिला आहे, मुंबईत आज डबेवाला संघटनेने आपले काम बंद ठेवले आहे. मुंबईतल्या शाळा सुरु आहेत तर काही खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील शालेय बस न चालविण्याचा निर्णय स्कूल बस असोशिएशनने घेतला आहे. गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद आहेत. सुरू असलेल्या शाळांमध्ये ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील एसटी आगाराची वाहतूक बंद आहे. कांदा मार्केट बंद असून, कांद्याचा गुरुवारी सकाळी लिलाव होणार आहे. आडते-व्यापा-यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

अमरावती : अमरावतीमध्ये काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात एसटी सेवा ३ जानेवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.अकोला जिल्ह्यातील माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत.

Previous articleमहाराष्ट्र बंद : ठाण्यात जमावबंदी
Next articleमहाराष्ट्र बंद मागे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here