मंत्रालयात शुकशुकाट
मुंबई : भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आज पाळण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणाम मंत्रालयातील कर्मचा-यांच्या उपस्थितीवर आणि अभ्यागतांवर झाला.
राज्यात आणि मुंबईत काही अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला असला तरी या बंदचा परिणाम मंत्रालयातील कर्मचा-यांच्या उपस्थितीवर झाला आहे. आज सकाळपासुनच रस्ते आणि उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मंत्रालयातील कर्मचारी वेळेत पोहचू शकले नसल्याने आज केवळ ४० टक्के एवढीच कर्मचा-यांची उपस्थिती होती अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तर; मंगळवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या दुस-या दिवशी राज्यातील विविध भागातील लोक आपल्या कामानिमित्त मंत्रालयात येतात. मंत्रालयात प्रवेशासाठी मंत्रालयाच्या तीन प्रवेश पास खिडकीवर दररोज लाखोच्या संख्येने येणारे अभ्यागत रांगेत उभे राहिल्याचे चित्र नेहमी दिसते. मात्र आज या तीनही पास खिडकीवर तुरळक गर्दी दिसत होती.
मंत्रालयातील कर्मचारी आणि अभ्यागतांची तुरळक उपस्थिती असल्याने मंत्रालय परिसरात आणि विविध कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात करण्यात आलेल्या फौजफाट्यामुळे मंत्रालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.