मुख्यमंत्री…. सोशल मिडीयावरील विकृत प्रचार थांबवा
धनंजय मुंडे
मुंबई : देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून विरोधी पक्षांबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अतिशय विकृत प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या अकाऊंटवरून चालणाऱ्या या प्रकाराला मुख्यमंत्र्यांची संमतीआहे का ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रकाराला संमती नसेल तर या अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यातील विद्यमान परिस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर पोस्ट केल्या जात आहेत. या बदनामीकारक पोस्टला आक्षेप घेत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकाराचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून, सरकारचा आपले अपयश झाकण्याचा आणि जातीयवादी शक्तींना पाठीशी घालण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पवार साहेब यांनीच या घटनेनंतर सर्वात प्रथम शांततेचे आवाहन केले होते.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मिडीयावरुन अफवा पसरविल्यासकारवाई करण्याच्या घोषणा करतात आणि त्यांच्याच नावाने चालणाऱ्या पेज आणि अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट होतात, याचा अर्थ काय ? असा सवाल करून ही खाती चालवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? आणि तो नसेल तर त्यांनी या खात्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल टिप्पणी करणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली होती, याची आठवण करून देत या प्रकरणातही तोच न्याय लावावा असे मुंडे यांनी म्हटले आहे. या अकाऊंटवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काही परिस्थिती उद्भवल्यास त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशाराही त्यांनी दिला आहे. रस्त्यावरच्या खड्यांचे फोटो फेसबुकवर टाकले म्हणुन कारवाई करणारे सायबर सेलचे पोलीस अधिकारी आता झोपा काढत आहेत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.