पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाचे स्वागत

पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाचे स्वागत

संसदीय समितीची शिवसेनाप्रमुखांच्याच विचारास मान्यता

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची प्रतिक्रिया

मुंबई  : पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कडाडून विरोध केला. संसदेच्या परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार समितीने परराष्ट्र मंत्र्यांच्या या निर्णयास मान्यता दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळण्यास सातत्याने विरोध करीत होते. संसदीय समितीने आज एकप्रकारे शिवसेनाप्रमुखांच्याच विचारास मान्यता दिली असून त्याबद्दल मी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर संसदीय समितीचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

त्यावेळी काव काव करणारे ‘कावळे’ आता कुठे गेले ?

मंत्री  रावते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास तसेच इतर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास नेहमीच विरोध केला. त्यावेळी बाळासाहेबांच्या या विचाराशी असहमती दर्शविताना ‘खेळात राजकारण आणू नका’ असे म्हणत अनेक कावळे काव काव करीत होते. अनेक संपादक अग्रलेख तर अनेक जण वाचकांच्या पत्रांमधून प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. आता या कावळ्यांची कावकाव का बंद झाली आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दहशतवादी कारवायांच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्यासंदर्भात परराष्ट्रमंत्र्यांसह संसदीय समितीने ठामपणे निर्णय घेतला. या माध्यमातून संसदीय समितीने शिवसेनाप्रमुखांच्याच विचारास मान्यता दिली आहे. समितीच्या या निर्णयाबद्दल आपणास अभिमान वाटतो. तसेच हा निर्णय होण्यासाठी ठामपणे भूमिका मांडल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया मंत्री रावते यांनी व्यक्त केली आहे.

 

Previous articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खुर्ची धोक्यात ?
Next articleकुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here