देशात उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

देशात उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

विद्यापीठ प्रवेशामध्ये महाराष्ट्र अव्वल; ९ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

नवी दिल्ली : तंत्रशिक्षण, दूरशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्धी प्रवेश आदी विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र देशपातळीवर केले गेलेल्या उच्च शिक्षण सर्वेक्षणातुन समोर आले आहे.

केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्च शिक्षणाची देशातील सद्यस्थिती दर्शविणारा २०१६-१७ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले.देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात ९ लाख ४० हजार ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू ८ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या तर दिल्ली ७ लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशासह तिसऱ्या स्थानावर आहे.

दुरशिक्षणात महाराष्ट्र नंबर १

देशातल्या दूर शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी नोंदणी मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. देशात ४० लाख ८९ हजार ७८१ विद्यार्थी दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत, यात १७.१ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, राज्यात सुमारे ७ लाख विद्यार्थी दुरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

सर्वाधिक कॉलेज असणाऱ्या देशातील टॉप १० जिल्ह्यात महाराष्ट्रातील ३ जिल्हे

सर्वाधिक कॉलेज असणारे देशात १० जिल्हे आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कॉलेज असलेल्या जिल्ह्यात बेंगलोर १ हजार २५ कॉलेजसह प्रथम आहे तर पुणे – ५२१ कॉलेज, नागपूर- ३३२ तर मुंबईत ३२२ कॉलेज असे एकूण १ हजार ७५ कॉलेज या तीन जिल्ह्यात आहेत.

शिक्षक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात सर्वाधिक

देशात सर्वाधिक शिक्षक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. राज्यात ४ हजार ३०८ शिक्षक प्रशिक्षण संस्था आहेत, या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येतही महाराष्ट्र अव्वल आहे, एकूण ३९ हजार ६५७ विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, यामध्ये २९ हजार ८२२ विद्यार्थिनीच्या समावेश आहे. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मुलींच्या प्रवेशामध्ये राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे तर तामिळनाडू मुलींच्या प्रवेशात अव्वल ठरले आहे.

सर्वाधिक पॉलीटेक्निक कॉलेज महाराष्ट्रात

देशात ३ हजार ६७२ पॉलीटेक्निक कॉलेज आहेत,यापैकी ६६७ कॉलेज राज्यात आहेत, यामध्ये २ लाख ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पॉलीटेक्निक कॉलेज प्रवेशामध्ये तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Previous articleसभागृह दणाणून सोडणारे धनंजय मुंडे जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरतात!
Next articleअशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदी कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here