१० जानेवारीला महाराष्ट्र बंद नाही ! अफवांवर विश्वास ठेवू नका
मुंबई : मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या १० जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली नसून, अशा आशयाची एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही बंद पुकारण्यात आला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज हे समाजाचे व्यासपीठ आहे. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाची कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही, आणि कोणीही मराठा सामाजाच्या नावावर मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा समाजाने बंद पुकारलेला नाही असे समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी स्पष्ट केले आहे.
भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात एकाला आपला जीव गमवावा लागला तर २ जानेवारी रोजी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. याच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र ‘महाराष्ट्र बंद’बाबत असा कोणताही निर्णय झालेला नाही आणि येत्या १० जानेवारीला कुठलाही बंद ठेवला जाणार नसल्याचे पोखरकर यांनी सांगितले आहे.