मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा निलंबित करुन चौकशी करावी
संजय निरूपम यांची मागणी
मुंबई : कमला मिल घटनेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तच जबाबदार असून, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करावी अशी मागणी मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज केला आहे.
कमला मिल जळीतकांडात १४ निष्पाप लोकांचा जीव गेला असल्याने याची चौकशी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनाच करायला लावणे चुकीचे असल्याचे निरेपम यांनी सांगून याला आक्षेप घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकतर आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकरण दडपत असुन त्यासाठीच आयुक्तांद्वारे चौकशी करण्याचे ढोंग करत आहेत, असा आरोपही निरुपम यांनी केला.
नागपुरच्या बेफिकीर आणि बदमाश लोकांमुळे मुंबईचे नाव बदनाम होते असे सांगून निरुपम यांनी या प्रकरणी थेट मुख्यंत्र्यांनाही लक्ष्य केले. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या मोजो पबचे सहा मालकांपैकी पाच जण नागपूरचे आहेत, असा दावाही निरूपम यांनी केला. नागपूरच्या एका भाजपा आमदाराने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावले. या सर्वांची नागपूरमध्ये एक वर्षापुर्वी बैठकही झाली आहे, असा गौप्यस्फोट निरूपम यांनी केला.कोणत्या राजकीय व्यक्तीने फोनकरून दबाव टाकला, हे आयुक्तांनी जाहीर करावे अन्यथा त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे निरूपम म्हणाले.मुंबईतील ज्या मिल जमिनींचे मॉलमध्ये रूपांतर झाले आहे, त्या सर्वच प्रकरणांची सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी निरुपम यांनी केली.