काँग्रेसला झाकण्यासाठी निरुपम यांचे आरोप
माधव भांडारी यांचे प्रत्युत्तर
मुंबई : कमला मिल आग प्रकरणी वेगाने तपास सुरू असून या प्रकरणातील आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यांपर्यंत पोलीस पोहचत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या मिल ते मॉल रुपांतरातील भ्रष्टाचार या आगीच्या तपासात बाहेर पडण्याची शक्यता दिसू लागल्यानंतर तपासी यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भानगडी बाहेर पडू नयेत यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले.
भांडारी की, कमला मिलमध्ये दोन पबला आग लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर वेगाने चौकशी सुरू आहे. मोजो ब्रिस्टो पबच्या एका मालकाला पोलिसांनी अटकही केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हा तपास खोलवर केल्यास मुंबईतील मिल ते मॉल रुपांतरातील आघाडी सरकारचा संबंध आणि त्यातील भानगडी उघडकीस येतील अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी मोजो रेस्टॉरंटला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा धादांत खोटा आरोप केला आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होईल व कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने हादरलेल्या निरुपम यांनी तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी आरोप केले. पण असे आरोप करून ते तपासी यंत्रणांना दोषींपर्यंत जाण्यापासून रोखू शकणार नाहीत.मुख्यमंत्री नागपूरचे आहेत म्हणून वारंवार नागपूरला बदनाम करण्याची भूमिका काँग्रेसने सोडून द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.