कृषिमंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या वाहनांवर ५० लाखांची उधळपट्टी !
मुंबई : डबघाईला आलेल्या महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाने राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिलेल्या वाहन आणि चालकावर ७ महिन्यांत तब्बल ५० लाख रुपयांपेक्षा जासात खर्च केल्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्राप्त झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही या महामंडळानेच वाहनचालक देवून त्याला पगार देत सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
शासकीय परिवहन सेवेत असणारे वाहन मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाकरिता प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करुन दिले जाते मात्र राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अतिरिक्त दोन तर; राज्यमंत्री सदा खोत यांनी अतिरिक्त एका वाहनाचा वापर करीत असून,त्यासाठी त्यांना वाहन चालकही देण्यात आल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांनी दिली आहे. माजी कृषि मंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि कृषि खात्याचे प्रधान सचिव यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याची माहिती समोर आली आहे . माहिती कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांसकडे कृषि मंत्री आणि कृषि राज्यमंत्री यांच्यासमेत ज्यांस गाड्या पुरविल्या आहेत त्याची माहिती मागितली होती.
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाकडून उपलब्ध करुन दिलेल्या माहितीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना दोन गाड्यासह तीन वाहन चालक दिले असून तिन्ही चालक हे कंत्राट पध्दतीवर काम करीत आहेत. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना एच गाडी दिली असून दोन्ही वाहन चालच कंत्राट पद्धतीवरच आहेत. कृषि खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषि मंत्र्यांचे खाजगी सचिव धुरजड यांस प्रत्येकी एक गाडी दिली असून, चालक महामंडळाचा स्थायी कर्मचारी आहेत. माजी कृषि मंत्री आणि सद्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी स्वतःची असून चालक मात्र महामंडळाचा स्थायी कर्मचारी आहे. फुंडकर यांस दिलेल्या दोन गाड्यांवर इंधन, सर्व्हिस आणि दुरुस्ती खर्चावर ७ महिन्यात २५ लाख,२५ हजार ८०९ एवढा खर्च करण्यात आला आहे. राज्यमंत्री खोतासाठी नवीन कोरी गाडी विकत घेत महामंडळाने गाडीसाठी आणि, इंधन आणि दुरुस्तीवर २६ लाख ,५०हजार,२७८ एवढी उधळपट्टी केली आहे. प्रधान सचिव बिजयकुमार यांस दिलेल्या गाडीचे इंधन आणि सर्व्हिसवर एकेण ६६ हजार ३५ एवढा खर्च झाला आहे. कृषि मंत्र्यांचे खाजगी सचिव धुरजड यांना दिलेल्या गाडीच्या इंधनावर ४७ हजार ५३४ इतकी रक्कम खर्च केली आहे. कृषि खात्याचे अवर सचिव उ. म. मदन यांनी दिलेल्या माहितीनुसार कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर आणि कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी १९ लाख,९९ हजार ९९९ इतक्या रक्कमेची गाडी पुरविण्यात आली आहे.