बचतगट उत्‍पादित वस्‍तूंसाठी आता राज्‍य शासनाचा ‘अस्मिता ब्रॅन्‍ड’   

बचतगट उत्‍पादित वस्‍तूंसाठी आता राज्‍य शासनाचा ‘अस्मिता ब्रॅन्‍ड’     

ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे

अहमदनगर : स्‍वयंसहायता बचतगटांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तूंना बाजारपेठ मिळवून देण्‍यासाठी  राज्‍य शासनाने स्‍वतःचा ‘अस्मिता ब्रॅन्‍ड’ विकसित केला असल्‍याची माहिती  राज्‍याच्‍या  ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे दिली.

अहमदनगर शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग आणि नाशिक महसूल विभागातील जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेच्‍या सहयोगातून आयोजित साई ज्‍योती स्‍वयंसाहय्यता यात्रा-२०१८ या प्रदर्शन व विक्री उपक्रमांत महिला मेळाव्‍याला मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्‍या. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील,  महापौर सुरेखा कदम, जिल्‍हा परिषदेच्‍या उपाध्‍यक्षा राजश्री घुले पाटील,  खा. दिलीप गांधी, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, विभागीय आयुक्‍त महेश झगडे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री मुंडे म्‍हणाल्‍या, बचतगटांच्‍या माध्‍यमातून महिलांच्‍या  आर्थिक सक्षमीकरणावर राज्‍य शासनाचा भर आहे.  कौटुबिक अर्थव्‍यवस्‍थेत  महिलांची भूमिका महत्‍वाची  आहे.  महिलांच्‍या आर्थिक उत्‍थानासाठी  राज्‍य शासन कटीबध्‍द असल्‍याचे सांगतांना राज्‍यात महिला बचतगटांच्‍या चळवळीला बळ देण्‍याचे काम केले असून महिला आर्थिकदृष्‍टया  सक्षम झाली तर त्‍या कुटूंबाच्‍या कौंटुबिक अर्थव्‍यवस्‍थेला मदत होते.  दारिद्रय निर्मूलन करुन महिलांना उमेद अभियानाच्‍या माध्‍यमातून  आर्थिकदृष्‍टया सक्षम करण्‍याचे काम होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बचतगटाच्‍या कर्ज परत फेडीचे प्रमाण अत्‍यंत चांगले असून महिला आर्थिक नियोजनात महत्‍वाची भूमिका बजावत असल्‍याचे सांगून  ग्रामविकास मंत्री मुंडे म्‍हणाल्‍या, राज्‍यातील बचतगट चळवळीचा आढावा घेतला त्‍यावेळी कर्ज परत फेडीचे प्रमाण व टंचाईस्थितीतही महिला सक्षमपणे उभ्‍या आहेत हेच बचतगट चळवळीचे यश असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. स्‍त्रीभ्रुणहत्‍या रोखण्‍यासाठी बेटी बचाव, बेटी पढाव अभियान अत्‍यंत प्रभावीपणे राबविल्‍या जात आहे. बीड जिल्‍हयात ८०० मुलामागे मुलींचे प्रमाण ९१४ एवढे आहे.  ही अभिमानाची बाब आहे. माझी कन्‍या भाग्‍यश्री योजने अंतर्गत जिजाऊंच्‍या जन्‍मदिनी सिंदखेडराजा  येथून बेटी सन्‍मान यात्रा काढण्‍यात येणार आहे. या यात्रेचा रथ रमाई, सावित्री , अहिल्‍यादेवींच्‍या जन्‍मगावी जाणार आहे. माझी कन्‍या भाग्‍यश्री योजने अंतर्गत १० हजार लाभार्थींचाही सन्‍मान केला जाणार आहे. मुलींना शिक्षण, रोजगार , सुरक्षा व सन्‍मान  या प्रवासात कुटूंबातील महिलांनी व प्रत्‍येक आईवडीलांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

राज्‍य शासनाने अस्मिता बाजार नावाने एक ब्रॅन्‍ड तयार केला असल्‍याचे सांगून मुंडे म्‍हणाल्‍या, मुंबई येथे महालक्ष्‍मी सरस या राज्‍यपातळीवर प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. ग्रामीण भागातील उत्‍पादनाला मुंबईत मोठी मागणी असते.  आपणही या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असे आवाहन करुन ग्रामीण भागात रस्‍ते, जलयुक्‍त शिवार, शेती आदीसह विकास कामे गतीने सुरु आहेत. मुख्‍यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत नगर जिल्‍हयाला भरीव निधी देण्‍यात आला आहे. ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविण्‍यावर सरकारचा भर असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी जिल्‍हयात सात्‍यतपूर्ण भरणारे ९ वे व ५ वे विभागीय प्रदर्शन आहे. साई ज्‍योती नावाने ब्रॅन्‍ड तयार करण्‍यात आला आहे. ग्रामीण भागात बचतगटाच्‍या माध्‍यमातून सेंद्रीय शेती केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.विभागीय आयुक्‍त महेश झगडे म्‍हणाले, महिलांनी उत्‍पादीत केलेल्‍या उत्‍पादनाला जगभरात बाजारपेठ आहे. महिलांनी एकत्रित येऊन ब्रॅन्‍डींग तयार करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्‍या संधी व आर्थिक व्‍यवस्‍था सदृढ होण्‍यासाठी महिला चांगले काम करीत आहेत. कर्ज पुरवठया संदर्भातील अडचणी दूर करण्‍यासोबतच बचतगटांनी उत्‍पादीत केलेल्‍या उत्‍पादनाला बाजारपेठ उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे त्‍यांनी  सांगितले.

 

 

Previous articleआर्थिक मागासवर्गाच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख
Next articleमराठवाड्यातील “हल्लाबोल यात्रा” हा सरकारला निर्वाणीचा इशारा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here