मराठवाड्यातील “हल्लाबोल यात्रा” हा सरकारला निर्वाणीचा इशारा
धनंजय मुंडे
बीड : शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक आणि मराठवाड्याच्या विविध प्रश्नासाठी १६ जानेवारी पासून मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. हि यात्रा म्हणजे सरकारला निर्वाणीचा अंतिम इशारा असल्याचे ते म्हणाले .या यात्रेदरम्यान बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६ सभा होणार आहेत
हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज मुंडे बीड येथे आले होते. पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तसेच बैठकीस माजी मंत्री आ अमरसिंह पंडित, माजी आमदार पृथ्वीराज साठे, उषाताई दराडे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, युवक नेते, संदीप श्रीरसागर , जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, महिला अध्यक्षा सौ. रेखाताई फड, डी बी बागल, महेंद्र गर्जे , डॉ नरेंद्र काळे, गोविंद देशमुख, फारूक पटेल, अविनाश नाईकवाडे आदीसह जिल्ह्यातले नेते उपस्थित होते.
कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीने कापूस पीकाच्या झालेल्या नुकसानीला मदत नाही, शेतमालाला हमीभाव सरकार दयायला तयार नाही, कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे.वीजेचा प्रश्न आणि मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होत असलेला दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी या विरोधात आम्ही सरकारविरुद्ध पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहोत.
या हल्लाबोल यात्रेची सुरुवात १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत दहा दिवसामध्ये दररोज ३ या प्रमाणे २८ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडयाच्या आठही जिल्हयामध्ये दिवसाला तीन सभा घेतल्या जाणार आहेत. तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाने या हल्लाबोल यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.या हल्लाबोल यात्रेत १६ जानेवारीला उस्मानाबाद जिल्हयात सकाळी ११ वाजता तुळजापूर, दुपारी ४ वाजता उमरगा, सायंकाळी ७ वाजता उस्मानाबाद, १७ जानेवारी सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा, सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला बीड जिल्हयात सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला लातूर जिल्हयात सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ३ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला नांदेड जिल्हयात दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला हिंगोली, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ३ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला जालना, परभणी जिल्हयात सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ३ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता परतूर, २४ जानेवारीला जालना जिल्हयात सकाळी ११ वाजता घनसांगवी, दुपारी ३ वाजता बदनापूर, सायंकाळी ७ वाजता भोकरदन येथे सभा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
या हल्लाबोल यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आ जितेंद्र आवाड, प्रवक्ते नवाब मलिक, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते, सर्व आमदार, खासदार आदी महत्वाच्या नेत्यांसह आणि मराठवाडयातील पक्षाचे सर्व आमदार आणि विविध आघाडयांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या हल्लाबोल यात्रेचा समारोप हा औरंगाबादमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेने ३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज हि देता येते , महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.
शेतकऱ्यांना वाढीव दिलेली विजेची बिले ही मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली .कापसावरील बोन्ड अळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाहीर केलेली मदत फसवी आहे. बियाणे कंपन्या मदत देण्यास तयार नाहीत त्या मोन्सेटो कंपनी कडे बोट दाखवत आहेत , ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल मग शेतक-यांना मदत केंव्हा मिळणार ? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.राज्यातील अशांत परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे, सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला.