मुद्रा योजनेत देशातील अव्वल तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश

मुद्रा योजनेत देशातील अव्वल तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश

नवी दिल्ली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात ४२ हजार ८६० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत ४० हजार कोटीहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील अव्वल तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.

देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना एप्रिल २०१५ रोजी सुरू केली. या योजनेत शिशु, किशोर व तरुण कर्ज अश्या तीन टप्प्यात ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत बँकांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात ९१ लाख ५३ हजार ६१९ कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून ४४ हजार ४९ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे व ४२ हजार ८६० कोटी ४३ लाख रुपये लघुउद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. सन २०१५-१६ या वर्षात १३ हजार ३८२ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले. २०१६- १७ या वर्षात १६ हजार कोटी ९७६ लाख ७६ हजार तर २०१७-१८ यावर्षात १२ हजार ५११ कोटी २५ लाख इतके कर्ज प्रत्यक्षात लघु उदद्योजकाना वितरित करण्यात आले.मुद्रा योजनेतील तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. या प्रकारात ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. गेल्या तीन वर्षात तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्रात १२ हजार १७६ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहे.

किशोर कर्ज गटात ५० हजार ते ५ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते .या मध्ये राज्यात तीन वर्षात ११ हजार ९५६ कोटी ९५ लाख तर शिशु कर्ज गटात १८ हजार ७२७ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. शिशु गटात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. मुद्रा योजनेत तीन वर्षात १० कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लघु उद्योगांना ४ लाख ४३ हजार ४९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू ही राज्ये मुद्रा योजनेच्या अंमलबजावणी मध्ये अव्वल तीन मध्ये समाविष्ट आहेत. या तीन राज्यात ४० हजार कोटीहून अधिक रुपयांचे कर्ज गेल्या तीन वर्षात वितरित झाले आहे.

 

Previous articleराज्याला विकास आणि एकोप्याच्या वातावरणाची गरज
Next articleस्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here