पत्रकारितेमध्ये विजय वैद्य यांची निस्पृह व रोखठोक भूमिका
मुख्यमंत्री
मुंबई : पत्रकारितेमध्ये विजय वैद्य यांची निस्पृह व रोखठोक भूमिका राहिली आहे. त्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन लिखाण केले. ‘हरवलेल्या माणसांचा शोध’ या मोठ्या सामाजिक बांधिलकीच्या बाबीवर त्यांनी लिखाण केले. त्यामुळे शासन, पोलीस विभागालाही याची दखल घ्यावी लागली. पोलीस दलाने या कामासाठी वेगळा कक्ष केला. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वैद्य यांची स्तुती केली.
जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आज मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणारा “जीवन गौरव” पुरस्कार राज्यपाल सी. विद्यासागरराव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजभवनात झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सरिता कौशिक यांनी उत्कृष्ट शोध पत्रकारिता केली आहे. सरदेशमुख यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांना वेळोवेळी लेखनीद्वारे समोर आणले आहे. आशर यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ कामकाजाचे उत्कृष्ट वार्तांकन केले आहे,त्याबद्दल फडणवीस यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील पत्रकारिता अत्यंत प्रगल्भ अशी आहे. देशाच्या पत्रकारितेला दिशा देण्याचे काम राज्यातील पत्रकारितेने केले आहे. समाजात जातीयता, धर्मांधता,संकुचित वृत्तीला स्थान राहणार नाही हा दृष्टिकोन बाळगून पत्रकारांनी जबाबदारी पाडावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. भीमा- कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत माध्यमांनी लोकभावना उद्रेक होणार नाही याकडे लक्ष देत वृत्तांकन करण्याची विनंती केली होती. त्यास माध्यमांनी प्रतिसाद दिला याबद्दल माध्यमांचे त्यांनी अभिनंदन केले.