मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा संभाव्य अपघात आज पुन्हा एकदा टळला आहे.लँडिंग सुरु असतानाच हेलिकॉप्टर मार्गात वायर आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भाईंदर येथे एस.के स्टोन चौकीजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथील घोडबंदर वर्सोवा पुलाचे भूमीपूजन, आणि विविध विकास कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. मुंबई येथील एक कार्यक्रम उरकून हेलिकॉप्टर भाईंदर येथिल सेवन इल्वेन शाळेच्या प्रांगणात उतरणार होते. या शाळेच्या इमारतीतून दुसऱ्या इमारतीवर केबलची वायर गेली होती. मुख्यमंत्री आणि गडकरी यांचे हे हेलिकॉप्टर उतरत असताना हेलिकॉप्टर वैमानिकाला अचानक केबल दिसल्याने वैमानिकाने हेलिकॉप्टर उतरत असतानाच पुन्हा हवेत झेपवले. याप्रकरणी ग्राऊंड अभियंत्याला निलंबित करण्यात आले असून मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी हे रस्तेमार्गे मुंबईला रवाना झाले.२५ मे रोजी मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर असताना निलंगे येथे त्यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला होता. त्यांच्या हेलिकाॅप्टरने उड्डाण घेताच हेलिकाॅप्टरची पाती वीजेच्या तारांमध्ये अडकल्याने मोठा अपघात झाला.

७ जुलै रोजी अलिबागमध्ये येथे हेलिकाॅप्टर मध्ये मुख्यमंत्री बसण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांना तात्काळ दूर नेण्यात आले होते. त्यानंतर गेल्याच महिन्यात नाशिक येथून टेकऑफ करताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे लक्षात आल्याने हेलिकाॅप्टर पुन्हा खाली उतरविण्यात आले होते. अवघ्या ६ महिन्यांच्या आत चौथ्यांदा अशी घटना घडल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleदलित समाजावर सुरू असलेली अन्यायी कारवाई तात्काळ थांबवा
Next articleगोपीनाथ मुंडेसह ओबीसी समाजावर भाजपकडून अन्याय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here