पंकजाताई मुंडे यांचे विदर्भवासियांनी केले जोरदार स्वागत
बुलढाणा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आज विदर्भवासियांनी जोरदार स्वागत केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा फार मोठा वर्ग जिल्हयात असल्याने रस्त्यांवरून जात असताना गावांतील सर्वसामान्य माणूसही त्यांच्या स्वागतासाठी आतुर झाला होता. दौ-यात गावचा उल्लेख नसतानाही अनेक ठिकाणी सत्काराचे रूपांतर जाहीर सभेत कधी झाले ते कळलेच नाही.
पंकजा मुंडे आजपासून दोन दिवस बुलढाणा जिल्हयाच्या दौ-यावर आहेत.आज सकाळी हेलिकॉप्टरने सिंदखेडराजा येथे त्यांचे आगमन झाले. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावर जाऊन त्यांनी सर्वप्रथम वंदन केले. महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी त्यांनी महिला बालविकास विभागाच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती रथयात्रा सुरू केली आहे. ही यात्रा राज्यभर फिरून मुलींना जन्म देण्याविषयी पालकांमध्ये जागृती करणार आहे. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमास लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
दुसरबीड येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. शासनाच्या कल्याणकारी योजना जन सामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे त्या यावेळी म्हणाल्या. मेळाव्यापूर्वी त्यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केले. झोटिंगा, शेंदूरजन, मलकापूर पांगरा, अंबेवाडी, साखरखेर्डा, लव्हाळा, अमरापूर, उंदरी, खामगाव आदी ठिकाणी रस्त्यावर वाहनाचा ताफा थांबवून गावक-यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या निनादात जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी तर केवळ सत्कार करायचा म्हणून गावक-यांनी थांबवले आणि त्यांना दोन शब्द बोलायलाच लावले त्यामुळे सत्काराचे रूपांतर जाहीर सभेत कधी झाले ते कळलेच नाही. लोकांचे अभूतपूर्व प्रेम पाहून त्या ही भारावून गेल्या.