महामंडळावरील नियुक्त्या रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मुंबई : राज्यात भाजपची सत्ता येवून तीन वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानाही विविध महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्या रखडल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा पडली असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेते मंडळीमध्ये प्रचंड नाराजी आहे.
पंधरा वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्याने सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर आता अच्छे दिन येतील या आशेवर असलेल्या इच्छूकांच्या पदरी निराशा पडली आहे. राज्यातील फडणवीस सरकारने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत.मात्र विविध महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्या रखडल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. महामंडळावरील नियुक्त्या या लवकरच केल्या जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्त्या करण्याचे सुतोवाच केले होते. पण याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नसल्याने वर्षानुवर्षे पक्ष कार्य करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत.भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज दादरमधील कार्यालयात होणार आहे. या बैठकीमध्ये पक्षविस्तारासाठी राबविलेल्या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यास पक्षाने उभी केलेली यंत्रणा तिचाही आढावा घेण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे.