नाही तर मी पवारांची औलाद सांगणार नाही
अजित पवार
उस्मानाबाद ( भूम ) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही असा जबरदस्त आशावाद विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथे ही जाहीर सभा पार पडली. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेवून सुरु झालेली हल्लाबोल यात्रेला पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तसाच दुसऱ्यादिवशीच्या या हल्लाबोल यात्रेला प्रतिसाद मिळाला. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली परंतु या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधी पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे. सगळाच शेतकरी माझा मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.
आज कुठल्याही निवडणूका आलेल्या नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उध्वस्त होईल. बाजार उध्वस्त होईल आणि आर्थिक कंबरडे मोडून पडेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना पक्ष कसा चुकीच्या पध्दतीने जातोय याचे उदाहरणासह दाखले दिले. आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दयांना हात घातला आणि ते मुद्दे कशापध्दतीने सोडवले गेले पाहिजे याची गणिते मांडली. शिवाय पत्रकारितेला मॅनेज करण्याची भाषा या सरकारकडून कशी होत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या घटकाला कशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे लोकशाही कशी टिकणार, कसा सव्वा कोटीचा देश पुढे जाणार असा सवालही अजित पवार यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवली.