ग्रामपंचायतींना मिळणार स्वत:ची इमारत
मुंबई : स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना मिळणार आहे.
या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि १००० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. या निधीपैकी ९० टक्के रक्कम राज्य शासनामार्फत मिळणार असून १० टक्के रक्कम स्वनिधीतून उभारणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतींना सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर देखील इमारत उभारता येणार आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर इमारत उभारता येईल.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी किंवा आज जाहीर केलेली बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना यापैकी कोणत्या योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय बांधावयाचे आहे याबाबत संबंधित ग्रामसभेने ठराव करणे आवश्यक आहे. १००० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी इमारत बांधण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागिदारी संदर्भात किमान दोन वेळा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पीपीपी तत्त्वावर बांधकाम करण्यास प्रतिसाद मिळाला नसल्यास आज जाहीर केलेल्या योजनेतून इमारत उभारण्यास मान्यता मिळणार आहे.शासकीय-खाजगी भागीदारीतून बांधकाम करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यतेने स्वतंत्र धोरण ठरविण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी २५ कोटी इतका निधी राखून ठेवण्यात आला असून हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी प्रतीवर्षी साधारणपणे १२० कोटीप्रमाणे पुढील चार वर्षांमध्ये ४४० कोटींची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून ग्रामपंचायतींचे बांधकाम करण्यात आल्यास तेवढा निधी कमी लागू शकतो.