गरीबांच्या मुलांचे शिक्षण अडचणीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न

गरीबांच्या मुलांचे शिक्षण अडचणीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न

अजित पवार

बीड ( पाटोदा ) : देशात आज पत्रकार,अधिकारी,महिला आणि युवती सुरक्षित नाहीत. विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला,गुणवत्तेला चांगले दिवस असताना गरीबांच्या मुलांचे शिक्षण कसे अडचणीत येईल असा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केला.

आज बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा दाखल झाली. पहिली सभा उस्मानाबादमध्ये झाली त्यानंतर दुपारची सभा पाटोदा येथे पार पडली.या सरकारने राज्याला कंगाल करुन टाकले आहे. कित्येक लाख लोकांची रेशनवरील साखर बंद करुन टाकली आहे. त्यांना सणामध्ये गोडधोड करुन खायलाही सरकारने आडकाठी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मात्र उदयोगपतींना कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना मदत नाही. अडल्या-नडल्या शेतकऱ्यांना सरकार का मदत करत नाही असा सवाल पवार यांनी केला.डिजिटल आणि कॅशलेसच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न होतोय परंतु ग्रामीण भागातही बाब लक्षात येत नाहीय मात्र सरकारचे हे फसवे धोरण हळूहळू लक्षात येवू लागले आहे. जीएसटी, नोटाबंदी याचा फायदा कुणाला झाला तर कुणालाच नाही हेच उत्तर आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याकडे लक्ष दयायला वेळ सरकारला नाही असेही पवार म्हणाले.

साडेतीन वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. निव्वळ हुकुमशाही, हिटलरशाही सुरु आहे. परंतु ही हुकुमशाही फार काळ टिकत नाही. संघर्ष केल्याशिवाय, बोट वाकडं केल्याशिवाय लोणी मिळत नाही. त्यामुळे मंत्र्यांना फिरणंही कठिण झालं पाहिजे असे काम हल्लाबोलच्या माध्यमातून उभं राहिले पाहिजे असेही पवार म्हणाले.
जनतेच्या पैशाच्या जीवावर सरकार जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करत आहे. जनतेचा पैसा त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे परंतु या सरकारने अक्षरश: कंगाल करण्याचे धोरण सुरु ठेवले आहे असा अजित पवार यांनी केला.

 

Previous articleऔद्योगिक जमिनींच्या हस्तांतरणासाठी आता २५ टक्के शुल्क
Next articleकुष्ठरुग्णांच्या चांगल्या सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here