धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !

धनंजय… या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !

लातूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असून हल्ल्याबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना , धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन चंद्रकांत दादांना पाठव रे बाबा म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी दाखवली.

आज औसा (लातूर) येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजितदादांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. रस्त्यांची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अजितदादांनी रस्त्याची पाहणी करण्यासाठी उतरले. यावेळी धनंजय मुंडे यांनी दादांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चालवलेल्या #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. त्यावर दादांनी गंमतीदार उत्तर दिले. “धनंजय… आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बेल्फी  जमत नाही. तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा…” असे सांगितले. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोन मधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरु आहे. उस्मानाबाद, बीड आणि आज लातूर जिल्यात हल्लाबोल सभा झाल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते मराठवाड्यात आहेत. कालच भूम ते पाटोदा प्रवास केल्यानंतर पाटोदा येथील सभेत अजितदादांनी खड्ड्यावरून सरकारवर टिका केली होती. मराठवाड्यात रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, असं ते म्हणाले होते.

मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा, असे आवाहन केले होते. त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोशल मिडियावर #selfiewithpotholes असे कँम्पेन चालवले. ज्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. माध्यमानिही दखल घेतली. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एक खड्डा दिसणार नाही, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ही डेडलाईन पुढे ढकलून १५ जानेवारी करण्यात आली. मात्र आजही मराठवाड्याच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आपल्या बघायला मिळतात.आता स्वतः माजी उपमुख्यमंत्री यांनीच रस्त्यातील खड्ड्याची सेल्फी काढून पाठवल्याने चंद्रकांत दादा त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांचा साडे तीन वर्ष फक्त अभ्यास सुरु आहे
Next articleसहनशीलता संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here