मुंबई मॅरेथॉनमध्ये ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’
मुंबई : राज्याच्या परिवहन, आरटीओ, एसटी विभागातील अधिकारी, कर्मचार्यांसह ध्वनी प्रदूषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या सुमारे ३०० स्वयंसेवकांनी आज मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नारा दिला. ‘ध्वनी प्रदूषण टाळा, आरोग्य राखा’चा संदेश देत यातील काही जण हाफ मॅरेथॉनमध्ये तर काही जण ड्रीम रनमध्ये सहभागी झाले.
‘No Honking’चा संदेश देणारे पिवळे टी शर्ट आणि टोपी परिधान करून सहभागी झालेले हे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते सर्वांचे लक्ष वेधत होते. काही जणांनी पिवळा टी शर्ट आणि धोतर परिधान करून हॉर्न न वाजविण्याचा संदेश दिला. या मोहिमेत परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागातील सचिव, उपसचिव, आयएएस असोसिएशन, मुंबई आरटीओ, एसटी मुख्यालय आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक म्हणाले की, आपल्या वातावरणातील सुमारे ७० टक्के ध्वनी प्रदूषण हे वाहनांच्या आवाजामुळे होते. त्यातील ७० टक्के प्रदूषण हे विनाकारण हॉर्न वाजविल्यामुळे होते. विकसित राष्ट्रात कुठेही हॉर्न वाजविला जात नाही. आपणही हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखले पाहिजे. यासाठीच मागील दोन महिन्यांपासून ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ अभियान राबविले जात आहे. सर्वांनी हॉर्न न वाजविण्याचा संकल्प करून वातावरणातील ध्वनी प्रदूषण रोखवे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मॅरेथॉनमध्ये ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चे फलकही झळकविण्यात आले. ध्वनी प्रदूषण आणि विशेष करून हॉर्नच्या आवाजामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची यावेळी माहिती देण्यात आली.