२०१९ हे वर्ष काँग्रेसचे, भाजपच्या घरवापसीचे
खा. अशोक चव्हाण
पालघर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष असून २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असून भाजपच्या घरवापसीचे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले ते पालघर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना बोलत होते.
पालघर जिल्ह्यातील मनोर येथून काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबिरांना आजपासून सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर १७५३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाच्या नावाखाली जबरदस्तीने शेतक-यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. शेतक-याची जात संपवण्याचा विडा भाजप सरकारने उचलला आहे. राज्यातील शेतक-यांचा, कष्टक-यांचा या सरकारवर विश्वास राहिला नसून सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मोदी आणि फडणवीस निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरले आहेत. वर्षाला दोन कोटी नोक-या देण्याचे काय झाले? असे विचारले असता पंतप्रधान म्हणतात पकोडे विकणे हा रोजगार नाही का?, सुशिक्षित बेरोजगारांनी आता पकोडे विकायचे का? असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी केला. देशाचे संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव असून याविरोधात २६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्ह्यात संविधान बचाओ यात्रा काढणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली ते म्हणाले की “भाजप धोका है, लाथ मारो मौका है!” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय फायदा उचलण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपच्या सत्ताकाळात काळात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या किंमती वाढवून सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. गरिब, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिलांना काँग्रेसने दिलेले माहितीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, अन्न सुरक्षा, माहिती, शिक्षणाचा अधिकार असे अधिकार भाजप सरकारने काढून घेतले आहेत. जपानच्या पंतप्रधानांना निवडणूक जिंकून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प आणला असा आरोप करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात परिवर्तन होणार असे मोहन प्रकाश म्हणाले.