हुतात्म्यांचा अवमान करणा-या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी
काॅग्रेसची मागणी
मुंबई : महाराष्ट्रात जन्म घेतल्याची खंत बाळगणा-यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. थोर संतांची भूमी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांने धन्य झालेल्या कला, साहित्य, आर्थिक क्षेत्रात देशातील सर्वोच्च अशी कामगिरी करणा-या महाराष्ट्राचा अभिमान नसणा-यांना कपाळकरंटेच म्हणावे लागेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
सावंत म्हणाले की, नुकतेच कर्नाटकमधील एका मंत्र्यांने कर्नाटकच्या भूमीवर जय महाराष्ट्र म्हणून देणार नाही, असे म्हटले होते. परंतु चंद्रकांत पाटलांना कर्नाटक भूमीतच जन्म घ्यावा वाटतो हे दुर्देवी आहे. याच महाराष्ट्रातील मुंबईत स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणा-या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. टिळक, गोखले, आगरकर यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसेनान्यांची कर्मभूमी असेलल्या याच महाराष्ट्रातून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी चले जाव चा लढा सुरु केला आणि देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. पण स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नसल्याने राज्यातील तमाम नागरिकांना अभिमानास्पद असलेल्या या वस्तुस्थितीचा अभिमान चंद्रकांत पाटलांना नसेल परंतु किमान नागपूरची तरी चाड ठेवायला हवी होती असा टोला सावंत यांनी लगावला.
भाजप नेत्यांना महाराष्ट्र सोडून गुजरातसारख्या इतर राज्याच्या अभिमानाचा उमाळा अधून मधून येतच असतो. ज्या राज्यात निवडणुका असतील त्या राज्याचा आपल्याला किती अभिमान आहे हे दाखवण्याची स्पर्धाच भाजपात रंगलेली असते. चंद्रकांत पाटील यांनी अशाच स्पर्धेत कर्नाटकाचा अभिमान दाखवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या १०५ हुताम्यांचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सावंत यांनी केली.