वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा मुंबईत विस्तार

मुख्यमंत्री

मुंबई  : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे सांगितले.

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख श्री सीन डी क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यूचेन,शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर,नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी व्यापक चर्चा झाली.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.

क्लिन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून व्हॅल्यूचेनला अधिक चालना देऊन राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही चर्चा अन्न सुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटरला भेट दिली. गावांना डिजिटली कनेक्ट करण्याची व्यापक योजना आणि इंडस्ट्री ४.० अर्थात चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्द्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांनी यावेळी चर्चा केली. तसेच ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या मदत व पुनर्वसनासाठी मीर फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा क्रिस्टल ॲवॉर्ड मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले.

Previous articleशिवसेना विधानसभा, लोकसभा निवडणूका  स्वबळावर लढवणार
Next articleछाती किती इंचाची आहे; त्यापेक्षा शौर्य महत्वाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here