सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार्थींना मिळणार मानधन

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार्थींना मिळणार मानधन

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिल्या  जाणाऱ्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना  या वर्षापासून मासिक सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार तसेच संत रविदास पुरस्कार असे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.  सदरील पुरस्कारासोबत विजेत्यांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांचाही लाभ देण्यात येतो. आजवर ज्या पुरस्कार्थींना हे पुरस्कार मिळाले त्या सर्वांना मासिक सातशे रूपये मानधन देण्यात येईल.  ही मंडळी  पदरमोड करून समाजकार्य  करतात. त्यांच्या कार्याचा यथोचित आदर करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यासाठी समता  प्रतिष्ठाणच्या वतीने प्रत्येक पुरस्कार्थींना दरमहा सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येईल, सदर मानधन आजीवन मिळेल असेही बडोले यांनी स्पष्ट केले.
मंत्री राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे,ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते,ते इतिहास घडवू शकत नाहीत.वंचितांना, दुर्बलांना प्रकाश देण्याचे महान कार्य या देशातील व विशेषत: महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर दादासाहेब गायकवाड,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,संत रविदास, संत गाडगे महाराज इत्यादी थोर समाज सुधारक व संतांनी केलेले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज ही समाज सेवकांची नवी फळी निर्माण झाली आहे, होत आहे. समाज सेवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी सामान्यांसाठी वेचलेल्या जीवनाचे सार्थक व्हावे यासाठी त्यांना आजीवन मानधन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर
Next articleसंविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here