९ वर्षानंतर एलिफंटा महोत्सव एलिफंटा परिसरात
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : विविध नृत्य, संगीत आणि कलांच्या सादरीकरणातून देश – विदेशातील पर्यटक आणि कलारसीकांचे लक्ष वेधून घेणारा एलिफंटा महोत्सव यंदा पुन्हा एलिफंटा लेण्यांच्या परिसरात होणार आहे. मागील ९ वर्षापासून सुरक्षेच्या कारणास्तव हा महोत्सव गेट वे ऑफ इंडिया येथे होत होता. येत्या २७ व २८ जानेवारी रोजी हा महोत्सव लेण्यांच्या परिसरात होईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री रावल म्हणाले की, यंदा महोत्सवात ट्रेझरहंट ॲट एलिफंटा, शिल्पकला ॲट एलिफंटा, पेंट ॲट एलिफंटा असे विविध नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात नागरीकांबरोबर उदयोन्मुख तसेच व्यावसायिक शिल्पकार, चित्रकार आदींना सहभागी होता येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय कलाकारांमार्फत कलासादरीकरण होणार आहे. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झीया नाथ आणि सन्तन चक्रवर्ती यांचा ‘डान्स ऑफ लव्ह’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर तबलावादक संगिता त्रिवेदी यांचे सादरीकरण आणि सुमित नागदेव डान्स आर्टस् यांच्यामार्फत ‘ध्रुत’ हा कलाप्रकार सादर होईल.
२८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता ऐश्वर्या बडदे आणि स्मृती बडदे यांचा लावणीचा कार्यक्रम, डॉ. परिणीता शाह यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, हंसराज हंस यांचा सुफी नाईट कार्यक्रम, नितीश भारती यांच्यामार्फत ‘स्टोरी ऑफ एलिफंटा’ या विषयावर सँड आर्टचे सादरीकरण होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, एमटीडीसी आणि एअर बीएनबी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून या सहभागातून एलिफंटा लेणी परिसरात राहणाऱ्या लोकांना व्यवसाय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून लेण्यांच्या परिसरात राहण्यास उत्सूक असणाऱ्या पर्यटकांना ‘होम स्टे’ उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
रावल म्हणाले की, जागतिक वारसास्थळ असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या परिसरात वीजेची उपलब्धता होण्याबाबत उर्जामंत्र्यांशी आपले आजच बोलणे झाले. तेथे वीज उपलब्ध होण्याबाबत फक्त अंतिम तांत्रिक चाचणी बाकी आहे. ती पूर्ण झाल्यानंतर लेणी परिसरात लवकरच वीज उपलब्ध होईल. राज्य शासनाने यासंदर्भात कार्यवाही केली आहे. एलिफंटा लेण्यांवर जाण्यासाठी ट्रॉली सेवा सुरु करण्याचा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टने हाती घेतला आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत लेण्यांचा परिसर विकास आणि पर्यटन विकासाच्यादृष्टीने अशा विविध पद्धतीने व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.