सोडून..जाईन प्रयोग १९२ वा
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा कालच शिवसेनेने आपल्या कार्यकारणीच्या बैठकीत केली आहे. शिवसेनेच्या या घोषणेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेवर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.
शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून आपल्या फेसबुकवर आज प्रसिध्द केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे असल्याचे हे व्यंगचित्रात रेखाटण्यात येवून , ‘महाराष्ट्र सरकार(मधील एक) सादर करीत आहे (किती अंकी माहित नाही) परत सांगतो, सोडून जाईन! प्रयोग १९२(बहुदा)’ असे या व्यंगचित्रात लिहिण्यात आले आहे. तर उध्दव ठाकरे सोडू? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहेत. त्यावर ‘अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला’ असे उत्तर मुख्यमंत्री त्यांना देत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.