ग्रामीण भागातील मुलींना मिळणार ५ रुपयात सॅनिटरी नॅपकिन
अस्मिता योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणाऱ्या अस्मिता योजनेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांनाही या योजनेतून स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण महिला आणि मुलींच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने घेतलेला आजचा हा निर्णय महत्वाचा आणि क्रांतिकारक आहे. येत्या जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) या योजनेची राज्यात प्रभावी अमलबजावणी करू, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.
सॅनिटरी नॅपकीन महाग असल्यामुळे त्याच्या वापराचे प्रमाण अंदाजे फक्त १७ टक्के एवढे कमी आहे. तसेच सॅनिटरी नॅपकीन अभावी मासिक पाळीच्या काळात मुलींची शाळेतील उपस्थितीही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वर्षभरात या कारणास्तव मुलींची ५० ते ६० दिवस इतकी अनुपस्थिती होते. त्यामुळे आरोग्य रक्षणाबरोबरच शाळेतील उपस्थिती हाही विषय महत्वाचा होता. त्यामुळेच मुलींना फक्त 5 रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने उमेद या योजनेअंतर्गत सादर केला होता. त्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले.
राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ही योजना राबविली जाईल. बचत गटांच्यामार्फत या सॅनिटरी नॅपकीनची विक्री केली जाईल. त्यामुळे बचत गटांनाही रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही योजना क्रांतिकारी असून ती प्रभावीपणे राबवू, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.