मिलिंद एकबोटेंना शरद पवारांनी पाठिशी घातले
प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी केव्हाही अटक होण्याची शक्यता असलेले मिलींद एकबोटे यांना सासवड येथील हिंदु- मुस्लीम दंगलीसंदर्भात मोक्का लावण्याची शिफारस पुणे पोलीसांनी केली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिलिंद एकबोटे यांना पाठिशी घातल्याचा सनसनाटी आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. येथिल आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.
२००१ मध्ये सासवड येथे झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी मिलिंद एकबोटे यास मोक्का लावण्याची तयारी केली होती. मात्र शरद पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना मोक्का न लावण्याचे सूचना केली असा सनसनाटी आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करून , पवार यांनी असा हस्तक्षेप करायला नको होता असे सांगितले. एकबोटेला त्यावेळी मोक्का लागला असता तर भिमा -कोरेगावचा हिंसाचार घडलाच नसता, असा दावाही अॅड. आंबेडकर यांनी केला. ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असे वर्तन पवार यांचे आज पर्यंत राहिले असल्याचे अांबेडकर म्हणाले. मिलिंद एकबोटेचे भाजपशी संबंध असतानाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिशी घातले. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामाील होणार नाही असे सांगतानाच २६ जानेवारीला निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी नव्हतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस यांच्यात आघाडीबाबत बोलणी सुरू आहे, याबाबत आंबेडकर यांना विचारले पवार आणि चव्हाण यांची बोलणी म्हणजे चोराचोरातली बोलणी असल्याची त्यांनी टिका केली.