पत्रकारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पुरस्कार
सन्मानचिन्ह आणि एक लाख रूपयांचा धनादेश देणार- राजकुमार बडोले
मुंबई : वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांसाठी यंदापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारिता पुरस्कार देण्यात येईल, अशा घोषणेचा पुनरूच्चार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज केला.
अलिकडेच दोन फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे टाईम्स ऑफ इंडिया गृपच्या मिरर नाऊ या इंग्रजी राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांना मुकनायक हा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी कोल्हाटकर स्मारकात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली होती.
आज मंत्रालयातील आपल्या दालनात पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांनी यासंबंधीची माहिती दिली. प्रस्थापितांच्या व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात दुर्बल आणि वंचित असलेल्या मुक घटकांचा आवाज बुलंद करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ३१ जानेवारी १९२० रोजी मुकनायक वृत्तपत्र सुरु करून पत्रकाराची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या नावाने मुकनायक पत्रकारिता पुरस्कार देणे संयुक्तीक वाटते असे ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्या समता प्रतिष्ठाणच्या माध्यमातून एक लाख रूपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन लढवय्या पत्रकारांचा गौरव करण्यात येईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.