आघाडी संदर्भात दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांची आज बैठक

आघाडी संदर्भात दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांची आज बैठक

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये आघाडी करण्यासंदर्भात दोन्ही काॅग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज होणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी ही बैठक होणार असून,या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण ऊपस्थित राहाणार आहेत.या बैठकीपूर्वी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक दादरच्या टिळक भवन येथे होणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार होईल.

आज होणा-या या बैठकीत सरकारच्या विरोधात मोट बांधण्याबरोबरच आगामी निवडणूका आघाडी करून लढण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काॅग्रेससह सर्वच विरोधीपक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. त्याच धर्तीवर राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी आज काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा पूर्व आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने काॅग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.दोन्ही पक्षानी मिळून नुकतीच संविधान बचाव रॅली काढली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे सुतोवाच केले होते . त्यानुसार पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे.

Previous articleपंकजाताई मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हयाला मिळाला ८९ कोटीचा वाढीव निधी
Next articleदादरमध्ये रंगणार दोन दिवासीय गोवा फेस्टीवल २०१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here