एक हजार गावांचे “आदर्श गाव” म्हणून रुपांतर करणार
पंकजा मुंडे
मुंबई : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन ही एक नाविण्यपूर्ण संकल्पना आहे. राज्याच्या ग्रामीण भागात अमुलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता या संकल्पनेत आहे.गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करुन ग्रामीण भागांना शाश्वत विकासासाठी सक्षम व स्वयंपूर्ण करणे हा या उपक्रमांचा प्रमुख हेतू असून, या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळ किंवा अन्य सामाजिक समस्यांनी ग्रासलेल्या एक हजार गावांचे २०१८ पर्यंत आदर्श गाव म्हणून रुपांतर करण्यात येईल. या गावांचा आदर्श ठेवून राज्यातील अन्य गावांचा देखील विकास करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
आज मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, टाटा ट्रस्टचे प्रनिनिधी, वर्ल्ड बँकेचे अधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास विभागाने राज्यात महिला सक्षमीकरणासाठी महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली आहे. यामुळे महिला आपल्या कुटुंबाचा आधार बनत असून कुटुंबाची आर्थिक प्रगती होवून मुलांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होत आहे.महिला बचत गटांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सुमतीबाई सुकळीकर ग्रामीण उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले आहे यामुळे महिला बचत गट ग्रामीण भागात आपापले व्यवसाय सुरु केले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ या किशोरवयीन वयोगटातील विद्यार्थिनींना ५ रुपयात ८ सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी अस्मिता योजना सुरु करण्यात आली असून त्याचा शुभारंभ ८ मार्च या महिला दिनी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सामाजिक हिताच्या दृष्टीने कॉर्पोरेटसकडून हाती घेतले जाणारे प्रकल्प व अशा पध्दतीचे शासकीय उपक्रम यांच्या अंमलबजावणीत शासन व कॉर्पोरेटस् यांना एकत्रितपणे काम करता येईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या कॉर्पोरेटसच्या सामाजिक हिताच्या प्रकल्पांना, शासकीय योजना व प्रशासकीय यंत्रणा यांचे सहाय्य लाभणार आहे. त्याचप्रमाणे शासन देखील कॉर्पोरेटसचे तांत्रिक कौशल्य कामाच्या सर्वोत्तम पध्दती व अनुभव या सर्व गोष्टींना आपल्या कार्यामध्ये समाविष्ट करेल.
या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळ किंवा अन्य सामाजिक समस्यांनी ग्रासलेल्या १ हजार गावांचे २०१८ पर्यंत आदर्श गाव म्हणून रुपांतर करण्यात येईल. या गावांचा आदर्श ठेवून राज्यातील अन्य गावांचा देखील विकास करण्यात येणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.