मंत्रालयात आत्महत्या केलेला हर्षल रावते कोण होता ?
मुंबई : मंत्रालयात आत्महत्या केलेला हर्षल रावते याने मेव्हूणी सुवर्णा कदम हिला बॅकेत नोकरी लावतो म्हणून तिच्याकडून ८५ हजार रूपये घेतले होते. मात्र यामध्ये फसवणूक करीत आपली बदनामी होईल या भीतीने हर्षल यांने आपल्या मेव्हूणीवर चाकूने ४४ वार करून हत्या केली.यामध्ये त्याला जन्मठेप झाली आणि त्याची पैठण कारागृहात रवानगी करण्यात आली.
मंत्रालयात आज आत्महत्या केलेला हर्षल सुरेश रावते हा चेंबूर गावठाण, मुंबई येथे राहणारा असून, हर्षल हा आपली पत्नी सरितासोबत राहत होता. बँकेतील अधिकार्यांसोबत आपली ओळख असून, मेव्हूणी सुवर्णा कदम हिला नोकरी लावून देतो म्हणून त्याने ८५ हजार रूपये तिच्याकडून घेतले. त्यानंतर त्याने बनावट नियुक्तीपत्र तयार करून ते कुरियरमार्फत तीला पाठविले. ते नियुक्तीपत्र खोटे असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे सुवर्णा आता आपली बदनामी करेल, या भीतीने त्याने सुवर्णावर चाकूने ४४ वार करीत तिची हत्या केली. या प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात त्याला भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप, ३८० अन्वये ५ वर्ष कारावास अशी शिक्षा झाली आणि त्याची पैठण कारागृहात रवानगी करण्यात आली.कारागृहात शिक्षा भोगत असताना सुद्धा त्याला एक वेळ शिक्षा झाली आहे. त्याने आतापर्यंत १२ वर्ष ६ महिने निव्वळ शिक्षा भोगली आहे.
आतापर्यंत त्याने ६ वेळा संचित आणि २ वेळा अभिवचन रजा उपभोगल्या आहेत.शासन निर्णयाप्रमाणे खूनाच्या गुन्ह्यात कूरता अधिक असेल किंवा गुन्हा महिला वा बालकांविरूद्ध असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत २६ वर्षांनंतर माफी देता येते.त्यामुळे या प्रकरणात आणखी ५ वर्ष त्याला कायद्याने माफी देता येणे शक्य नव्हते, असे गृहविभागाने सांगितले.