भाजपाचा “गरिबरथ” यात्रेचा रविवार पासून मुंबईत झंझावात
रविवारी ६ वाजता काळाचौकी, जिजामाता नगरमधून रथयात्रेला सुरूवात
मुंबई : प्रजास्ताक दिना निमित्ताने मुंबईत काढलेल्या भव्य तिरंगा यात्रे नंतर आता मुंबई भाजपातर्फे रविवार पासून २२७ वॉर्डमध्ये झंझावती गरिबरथ यात्रा काढण्यात येणार आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात निघणा-या या गरिब रथयात्रेच्या निमित्ताने ते स्वतः मुंबईत ठिकठिकाणी छोटया छोटया १२ सभा घेऊन मुंबईकरांशी थेट संवाद साधणार आहेत.. सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारक सर्वांना घर असा संदेश घेऊन भाजपा ही यात्रा मुंबईतील सर्व झोपडट्टीविभाग पिंजून काढणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घर असे स्वप्न पाहिले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून मुंबईतील झोपडपट्टीत राहणा-या सर्वसामान्य माणसाला घर मिळावे म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यासह डिसेंबरमध्ये विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मुंबईतील २०११ पर्यंतच्या रहिवाशांना घर देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेतून ही घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा कायदा करून राज्य शासनाने मुंबईतील सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न नजरेच्या टप्प्यात आणले आहे. या निर्णयाचा फायदा मुंबईतील १८ लाख सर्वसामान्य रहिवाशांना होणार आहे. आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारने न घेतलेला हा निर्णय असून सामान्य मुंबईकर माणसाला मुंबई बाहेर न जाता त्याच्या हक्काचे घर यामुळे मिळणार आहे. म्हणूनच या योजनेची याची सविस्तर माहिती देत मुंबईत ६ गरिबरथ २२७ वॉर्डमध्ये फिरणार असून योजनेची माहिती असणारे सुमारे २५ हजाराहून अधिक माहितीपत्र या रथयात्रेच्या माध्यमातून कार्यकर्ते घराघरात वाटणार आहेत. यामध्ये मुंबईतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिका-यांसह शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.
या यात्रेचा एक भाग म्हणून आमदार अॅड आशिष शेलार थेट संवाद साधण्यासाठी सभा घेणार असून त्याची सुरूवात रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिजामाता नगर, अभ्युदय नगर जवळ, काळाचौकी येथून होणार असून त्याच दिवशी दुसरी सभा संध्याकाळी ७ वाजता भायखळा येथे होणार आहे. त्यानंतर रोज दोन या प्रमाणे मुंबईतील सहा जिल्हयांमध्ये एकुण १२ सभा होणार आहेत. त्यासाठी खास सहा गरिब रथ तयार करण्यात आले असून “गरिब के सन्मान में भाजपा मैदान में..” अशी घोषणा देत ही रथयात्रा मुंबईतील २२७ वॉर्ड मधील झोपडपट्टीतील सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहणार आहे, अशी माहिती या यात्रेंचे समन्वयक आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष विनायक कामत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या रथयात्रेतील मुंबई भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांची तीसरी सभा सोमवारी १२ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता काचवाला कंपाऊड, वाकोला येथे तर संध्याकाळी ८ वाजता तानाजी चौक न्यु मिल रोड कुर्ला येथे चौथी सभा होणार आहे. तर १३ फेबुवारीला संध्याकाळी ६ वाजता भरणी नाका, अॅन्टॉप हिल येथे तर ७ वाजता मानखुर्द रेल्वे स्टेशन येथे सहावी सभा होईल. बुधवारी १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अशोक केदारे चौक, ९० फिट रोड भांडूप पश्चिम येथे तर ९ वाजता संभाजी चौक सुर्य नगर विक्रोळी येथे सभा होणार आहे. गुरूवारी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता मरोळ, मरोशी रोड, अंधेरी येथे तर ८ वाजता शामनगर तलाव लिंक रोड येथे सभा होणार आहे. समारोपाच्या सभा उत्तर मुंबईत होणार असून ११ वी सभा १६ फेबुवारीला संध्याकाळी ६ वाजता संजय नगर, कांदिवाली येथे होणार असून रथयात्रेच्या समारोपाची १२ वी सभा रात्री ८ वाजता गणपत पाटील नगर येथे होणार असल्याचे विनायक कामत यांनी या पत्रकात जाहीर केले आहे.