गारपिटग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नुकसान भरपाई द्या !

गारपिटग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नुकसान भरपाई द्या !

विखे पाटील यांची मागणी

मुंबई : राज्याच्या अनेक भागात वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याअगोदर भरपाई देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. २ महीन्‍यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया पुर्ण न झाल्‍यास सरकारला अर्थसंकल्‍पीय आधिवेशनात जाब विचारु असा इशारा विरोधी पक्षनेत्‍यांनी दिला.

राज्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, विदर्भ,मराठवाडा आणि खान्देशात अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीने प्रचंड थैमान घातल्याच्या अनेक तक्रारी मला गारपीट झालेल्‍या जिल्ह्यांमधील कार्यकर्त्‍यांकडून प्राप्‍त झाल्‍या आहेत. या नैसर्गिक संकटात तिघांचा बळी गेला असून,कांदा, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून, कापणी केलेल्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

या नुकसानाची तातडीने स्थळपाहणी पंचनामे करण्याची मागणी करुन, ना.विखे पाटील यांनी सांगितले की, सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी,नुकसान झालेली घरे, शेती, पशूधन आदींचा तातडीने आढावा घेऊन संबंधितांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भरीव मदत देऊन दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी त्‍यांनी केली.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली याकडे विरोधी पक्षनेत्‍यांचे लक्ष वेधले असता त्‍यांनी शिक्षण विभागाच्‍या धोरणांवरच टिकास्‍त्र सोडले. अभियोग्यता चाचणी झालेली असताना सरकारला शिक्षक भरतीसाठी सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा?  असा सवाल करुन,आपल्‍या निर्णयावर सरकार प्रामाणिक असेल तर तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी करतानाच, सवंग लोकप्रियतेसाठी वाट्टेल ती घोषणा करण्याची या सरकारची भूमिका यापूर्वी अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे २४ हजार शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो. शिक्षकांची भरती झाली नाही तर,अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिला.

Previous articleभीमा कोरेगाव प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा केवळ फार्स असल्याचे उघड
Next articleऔरंगाबादमध्ये शहाच्या पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेनी तळली भजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here