सैन्यदलाच्या अवमानाबद्दल मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी
खा. अशोक चव्हाण
नांदेड : भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सैन्याचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा निषेध करित असून आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ सैन्यदलाची व देशाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, ज्यावेळी भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथे दहशतवाद्यांशी लढत होते. त्यावेळी मोहन भागवत यांनी लष्कराच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होतील असे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य लष्कराचे मानसिक खच्चीकरण व अवमान करणारे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधीत लढण्याच्या वेळी माफी नामे लिहून देणारे. ब्रिटिशांशी हातमिळवणी करून स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्यासाठी मदत करणारे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आज देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वत:च्या बेगड्या देशभक्तीची ग्वाही देत आहेत, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.