गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी
नांदेड : गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले असून नांदेड व परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली तसेच गारपिटीमध्ये मरण पावलेल्या भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांची चुडावा जि. परभणी येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली.
अवर्षण, बोंडअळीचा प्रादुर्भाव,पीक विमा भरून न घेणे व न मिळालेली कर्जमाफी यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांवर गारपिटीचे आणखी एक अस्मानी संकट कोसळले आहे. गारपीट होऊन तब्बल २४ तास उलटले तरीही नांदेड व परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात शासनाचा एकही प्रतिनिधी पोहोचला नाही. यावर खा. अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. मयत भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करताना आर्थिक मदतही केली.
खा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आजच्या पाहणी दौ-याची सुरुवात नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांच्यासमवेत लिंबगाव जि. नांदेड येथून केली. गारपीटग्रस्त लिंबगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाविरूध्द तीव्र रोष नोंदविला केवळ पंचनामे करणे व ऑनलाईन माहिती भरून घेणे यापलिकडे हे शासन काहीच करत नाही त्यामुळे या शासनाला घालविण्याचीच वेळ आली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया येथील अनेक शेतक-यांनी व्यक्त केली.
यानंतर परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे संत्रा, मोसंबी, गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत अशा सर्व भागांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भेटी दिल्या. निर्ढावलेल्या शासनाच्या शेतकरीविरोधी भूमिकेवर त्यांनी ताशेरे ओढले व पीकविमा बोंडअळी ग्रस्त शेतक-यांसारखे गारपीटग्रस्त शेतक-यांचे हाल करू नका असे शासनास सुनावले. त्यानंतर जिंतूर तालुक्यातील कौसडी, मारवाडी या गावातील गारपीटग्रस्त शिवाराची पाहणी करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शेतक-यांशी चर्चा केली. एका बाजूस खा. अशोक चव्हाण शेतक-यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत होते तर ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे त्या सत्ताधा-यांनी मात्र झोपेचे सोंग घेऊन संकटात असलेल्या शेतक-यांना वा-यावर सोडले आहे.