बेस्टमधील खाजगी गाड्या कंत्राटदाराच्या हितासाठी तर नाही ना ?
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
मुंबई : बेस्टचे मार्ग वाढवून मुंबईकरांना चांगली सेवा दिली पाहिजे. तसेच तोट्यातून हा उपक्रम बाहेर यावा. मात्र खाजगी बस घेण्याचा मार्ग हा बेस्टच्या हिताचा आहे की कोण्या कंत्राटदाराच्या हितासाठी तर नाहीना? हे पाहिले पाहिजे! अशी भाजपची भूमिका असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत पुढे म्हटले आहे की, खाजगी बस घेण्याबाबत न्यायालयाचा अंतिम निर्णय येई पर्यंत कोणताही निर्णय बेस्ट समितीने करू नये, अशी भूमिका भाजपा सदस्यांनी समितीच्या बैठकीत मांडली होती. त्याचा विचार न करता प्रस्ताव पारित केला. आज न्यायालयाने असेच निर्देश दिले. भाजपाचे म्हणणे ऐकले असते तर ही वेळ आज आली नसती!
दरम्यान, उद्या संप पुकारलेल्या बेस्ट वर्कर युनियनचे कामगार नेते शशांक राव यांनी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. तर आज भाजपा बेस्ट कामगार संघ आणि भाजपाचे बेस्ट कमिटी सदस्यांची बैठकही आमदार आशिष शेलार यांनी घेतली.