मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून ३५ लाख रोजगाराच्या संधी

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून ३५ लाख रोजगाराच्या संधी

मुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणुक परिषदेतून १० लक्ष कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर सुमारे साडे चार हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचे नियोजित असून,यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

येत्या १८ तारखेला एमएमआरडीए च्या प्रांगणात होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र -कन्व्हर्जन्स २०१८ या परिषदेचे उद्‍घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेची माहिती आज उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली, त्यावेळी ते बोलत होते.

देसाई पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापुर्वी मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. सन २०१६ मध्ये आयोजित या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे ६१ टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून १० लक्ष कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर सुमारे साडे चार हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचे नियोजित आहे.यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये राज्य अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर, नगर या ठिकाणी अद्ययावत औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी लागणा-या आयुधांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योग उभारणीसाठी लागणा-या सर्व परवानग्या एकत्रीतपणे मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मैत्री’ या एक खिडकी योजनेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आसून राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झाले आहे.राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी १२ नवीन धोरण जाहीर करण्यात आली आहेत. यात लॉजिस्टीक पार्क, वस्त्रोद्योग, फिन्टेक, जी. एस. टी. साठीचे धोरण इत्यादींचा समावेश आहे. राज्य औद्योगिक धोरणालाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रोजगार निर्मितीसह कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. उद्योग विभागाच्या अखत्यारितील जागांवर दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असेही देसाई यांनी सांगितले.

राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र – कन्व्हर्जन्स २०१८ या परिषदेत दुस-या दिवशी १९ फेब्रुवारीला एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ४७ मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेच्या विजेत्यांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८ स्टार्टअप अवार्डस अंडर ३०’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Previous articleसरपंच हाच पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा पाया
Next articleउध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here