उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा !
मुंबई : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र नाणारची बैठक संपताच या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाली.मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे शिष्टमंडळ तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि मिलिंद नार्वेकर या बैठकीला उपस्थित होते. बैठकीपूर्वी उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवणाऱ्या नागरीकांचे पत्रांचे गठ्ठे मुख्यमंत्र्यांना देत स्थानिकांसह शिवसेनेचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले.या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे यांच्यात सुमारे २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर या दोन नेत्यांची पहिलीच बैठक असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचे जाहीर केले असले तरी भाजपकडून पुन्हा युती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांसह शिवसेनेचाही विरोध आहे. आजच्या बैठकीत ग्रामस्थानी असहमती पत्रे आणली होती असे ठाकरे यांनी सांगितले.