भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविण्यात आशा भोसले यांचे मोलाचे योगदान

भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविण्यात आशा भोसले यांचे मोलाचे योगदान

–  राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई : भारतीय संगीताला जागतिक पातळीवर नेण्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जागतिक पातळीवरील संगीताच्या क्षेत्रात त्या भारताच्या ॲम्बॅसिडर आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

आशा भोसले यांना काल राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते ५ व्या राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जुहू येथील जे. डब्ल्यू. मेरीयट हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राव बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉ. टी. सुब्बरामी रेड्डी,चित्रपट अभिनेत्री रेखा, जयाप्रदा, पूनम ढिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे, परिणिती चोप्रा, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायिका अलका याज्ञिक, संयोजक अनु रंजन, शशी रंजन आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल राव म्हणाले, मी लहानपणापासून आशाजींची सुमधूर गाणी ऐकत मोठा झालो आहे. किंबहूना देश – विदेशातील अनेक पिढ्या त्यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आहेत. लावणी, गझल, डिस्को, पॉप अशा विविध प्रकारची गाणी आशाजींनी गायली आहेत. मागील साधारण ७ दशकात आशाजींनी विविध २० भाषांमध्ये २० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आशाजींनी त्यांच्या सुमधूर गायकीतून अनेक गाणी अजरामर केली आहेत. सितारवादक पं. रवीशंकर यांच्यानंतर आशा भोसले यांनी भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

राज्यपाल राव पुढे म्हणाले,बॉलिवूडच्या चित्रपटांचे फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश,अफगाणिस्थान, मध्य आशियाई देश, रशिया, इजिप्त,इंडोनेशिया आणि अनेक युरोपीयन देशांमध्ये स्वागत आणि कौतूक होत असते. अलिकडच्या काळात चीन आणि जपानमध्येही भारतीय चित्रपट लोकप्रिय होत आहेत. हिंदी चित्रपटांची ही पोहोच पाहता देश-विदेशांमध्ये बंधूभाव, मैत्री आणि शांततेला चालना देण्यासाठी बॉलिवूडचा निश्चितच उपयोग होऊ शकेल, असे ते म्हणाले. आशा भोसले यांनी यावेळी यश चोप्रा यांच्याविषयीच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या नावाने आज मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमान आहे, असे त्या म्हणाल्या.

Previous article…..तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही
Next articleभारतातही तिहेरी तलाकवर बंदी घालणे आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here