गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? 

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का

खा. अशोक चव्हाण

मुंबई :  गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का?  सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकोंडी गावातील शेतीचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यावर सरकारी मदत मिळेल या आशेवर शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत होते. पंचनामा करायला आलेल्या अधिका-यांनी शेतक-यांना गारपिटीमुळे उध्दवस्त झालेल्या पिकात उभे करून त्याच्या हातात नाव लिहिलेली पाटी देऊन गुन्हेगाराप्रमाणे त्यांचे फोटो काढले. पंचनामे करताना या अधिकाऱ्यांनी महिला शेतक-यांच्या हातात ही आरोपीसारख्या पाट्या देऊन त्यांचे फोटो काढले. सरकार शेतक-यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून सरकारने शेतक-यांची क्रूर थट्टा चालवली आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

जालना जिल्ह्यातही गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम केल्याशिवाय मदत मिळणार नाही. तसेच गारपिटीत मृत्यू झालेली जनावरे पोस्टमार्टम करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या असे तुघलकी फर्मान तेथील तलाठ्यांनी आणि अधिका-यांनी काढले होते. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यावर जिल्हाधिका-यांची भेट घेऊन ही तुघलकी फर्माने मागे घेऊन संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. अस्मानी संकटाने शेतकरी उध्दवस्त झाला आहे. त्यातच सुलतानी पंचनामे करून सरकार शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous articleअधिवेशनात सरकारला घेरण्याची काॅग्रेसची रणनीती
Next articleमोर्चामध्ये सहभागी होणा-या कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here