माझ्या राजाचा मान नाही ठेवायचा निदान अपमान करण्याचा अधिकार नाही 

माझ्या राजाचा मान नाही ठेवायचा निदान अपमान करण्याचा अधिकार नाही 

धनंजय मुंडे

जळगाव ( बोदवड ) :  छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलात आणि संघाच्या कार्यालयात छत्रपतींची जयंती साजरी करत नाही. सर्वांना कळू दे छत्रपतींबद्दल किती प्रेम यांच्या मनात आहे. जंयती साजरी न करणे हा छत्रपतींचा अपमान आहे. माझ्या राजाचा मान नाही ठेवायचा तर निदान अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही अशा भाषेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप आणि संघाच्या लोकांना बोदवडच्या जाहीर सभेत खडसावले.

ते जळगावच्या बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल सभेत बोलत होते. हल्लाबोलच्या सहाव्या दिवशी सतराव्या सभेत धनंजय मुंडे यांनी संघीप्रवृत्तीचा चांगलाच समाचार घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत आलात आणि त्यांच्या जयंतीदिनी एकही शासकीय जाहिरात दयायची नाही हा महाराजांचा अपमान आहेच आणि तमाम जनतेचाही अपमान असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

नाथाभाऊंना ३५ वर्ष आमदार केलेत.भरभरुन प्रेम दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही सुध्दा माझ्या बोदवडवासियांना २९ दिवसापासून पाणी मिळत नाही हे दुर्देव आहे. इथल्या लोकांच्या पदरी निराशाच टाकली आहे.असा लोकप्रतिनिधी काय कामाचा अशा भाषेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोदवडच्या जाहीर सभेत नाथाभाऊंचा समाचार घेतला.

जळगावच्या पालकमंत्र्यांनी महिलांचा अपमान करणे थांबवावे अन्यथा…खासदार सुप्रिया सुळे

महिला ही मातेसमान असते परंतु मातेसमान असलेल्या महिलेचे नाव दारुच्या बाटलीला देण्याची भाषा करणाऱ्या या जिल्हयाचे पालकमंत्र्याचे नाव घ्यावसं वाटत नाही.अशा प्रवृत्तीच्या माणसाबद्दल काय बोलावे.पण महिलांचा अपमान करण्याचे त्यांनी थांबवावे अन्यथा… असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी बोदवडच्या जाहीर सभेत पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिला.

जलसंपदा मंत्री जळगावचे पालकमंत्री आहेत. जर त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच पिण्याच्या पाण्याची इतकी भीषण अवस्था असेल तर उर्वरित महाराष्ट्राबद्दल तर बोलायलाच नको असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बोदवड येथे झालेल्या सभेला मोठया संख्येने महिला उपस्थित आहेत. बोदवड नगरपरिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे. बोदवड शहरात एका महिन्यातून एकदा पाणी येते. यावरून आठवलं २०१४ साली भाजपने नळाला पाणी येत नसल्याची जाहीरात दाखवली होती, ती इथलीच असावी असा टोलाही लगावला.

हल्लाबोल सभांना बोलत असताना माझ्यावर दडपण येत असते. जमलेल्या सर्व लोकांच्या डोळ्यात मला आमच्याबद्दल एक विश्वास दिसत आहे. हा विश्वास खरा करून दाखवण्याचे काम आमचे सर्व सहकारी मिळून करू, असा राज्यातील जनतेला माझा शब्द आहे असा विश्वास त्यांनी दिला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या बोदवड नगरपरिषदेत १७ पैकी ८ जागा राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी केले.

जळगावात घोषणांची खैरात मुख्यमंत्र्यांनी केली प्रत्यक्षात काहीच नाही – जयंत पाटील

शालेय पोषण आहारात केळयाचा वापर करणार,प्लास्टिक पार्क बांधणार,टेक्सस्टाईल पार्क उभारणार अशा किती तरी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या परंतु त्यापैकी काहीच पदरात जळगाववासियांच्या पदरी पडलेले नाही.स्टेजवरुन मोठयाप्रमाणात लोकं समोर दिसले की,निव्वळ घोषणांची खैरात मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी बोदवडच्या सभेत केला.या देशात नवीन चौकीदार आल्यानंतर विजय मल्ल्या ९ हजार कोटींचा चुना लावून परदेशात गेला. त्यानंतर आयपीएलचा ललित मोदी गेला आणि आत्ता साडे अकरा हजार कोटी बुडवून नीरव मोदी पळून गेला असा टोलाही लगावला.

भाजपवाले पक्के बेरके आहेत – भास्कर जाधव

अवघ्या साडेतीन वर्षात तुम्हाला काय केलं विचारावं लागतंय अशी तुमची काळी कारकीर्द आहे. ज्यांनी रामाला फसवलं ते आपल्याला फसवणार नाय कशावरुन. हे पक्के बेरके आहेत अशी टिका माजी मंत्री भास्कर जाधव यांनी बोदवडमध्ये केली.त्यांनी आपल्या भाषणात शिवसेना –भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेप्रमाणे या शिवसेनेचे झाले असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.त्यांनी आपल्या भाषणात अगदी कोकणी भाषेतल्या काही म्हणीही सांगत सभेचा माहोल बदलवून टाकला.

 

 

Previous articleराज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी गुंतवणूकीचे करार
Next articleगिरीषभाऊ…. मौका सभी को मिलता है !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here